ठाणे- गेल्या ७ वर्षांत १३४६ इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकारण्यात आले आहेत. मात्र, या यंत्रणेची काय स्थिती आहे. याबाबतची कोणतीच माहिती पालिकेकडे नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या ठाणे शहरात या वॉटर हार्वेस्टिंगचे काम पाहणारे केवळ 20 अभियंते आहेत. त्यामुळे अभियंत्याच्या कमतरतेचा फटका रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यंत्रणा तपासणीला बसत आहे.
राज्य शासनाने प्रत्येक इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे सक्तीचे केले आहे. भविष्यातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता, पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. याबाबत २००७-०८ पासूनच कायदा करण्यात आला आहे. मात्र, ठाण्यात २०१२-१३ पासूनच याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सुमारे ३०० स्के. फूट प्लॉटला हा प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या इमारतीला ओ.सी. प्रमाणपत्र देण्याअगोदर रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात आला आहे की नाही याची पालिकेच्या पाणी पुरवठा अभियंत्याकडून तपासणी केली जाते. त्यानानंतरच इमारतीला ओसी दिली जाते.