ठाणे- कल्याण आणि भिवंडीतील शनिवारी होणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे पुणे पाठोपाठ आता भिवंडी आणि कल्याण येथील राज ठाकरे यांच्या सभेवर पावसाचे पाणी फेरल्याने मनसेच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून आले.
ठाणे जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण परिसरात परतीच्या पावसाने सायंकाळच्या सुमारास गेल्या 15 दिवसांपासून धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आणले आहे. त्यातच निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने परतीच्या पावसाचा फटका सर्वच उमेदवारांना बसला आहे. आज सायंकाळी सात वाजता भिवंडीतील अंजुर फाटा येथे राज यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर कल्याणमधील फडके मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले, या दोन्ही सभा यशस्वी करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन तयारी केली. मात्र, सभा सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच पावसाने विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मैदानात पावसाचे पाणी साचलेले असून आता ह्या सभा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.