ठाणे - ठाण्यात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद आहेत, तर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करत जावे लागत आहेत.
ठाण्यात जोरदार पाऊस, रेल्वेसेवा ठप्प - पावसाचा रेल्वेवर परिणाम
ठाण्यातील घोडबंदरवरील ओवळा हनुमान मंदिर याठिकाणी रस्त्यावरील विद्युत पोलचा शॉक लागून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे घोडबंदर रोड येथील तुळशी धाम येथे झाड आणि विद्युत पोल कोसळण्याची घटना घडली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे.
मुंबईत सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रभादेवी व दादर स्थानकात मोठ्या प्रमाणात रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे दादरपर्यंत उपनगरीय मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वांद्रे ते डहाणू दरम्यान उपनगरीय गाड्या धीम्यागतीने उशिरा सुरू आहेत. तर, हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकात आणि मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात रुळावर मोठया प्रमाणात पाणी साचल्याने मुख्य व हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा रद्द करण्यात आली आहे. वाशी ते पनवेल आणि पनवेल ते ठाणे आणि कल्याणपर्यंत शटल सेवा सुरू आहेत. या पावसामुळे डाऊन दिशेला जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक देखील कोलमडले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचारी खोळंबले आहेत. यामध्ये पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, सुरक्षा रक्षक यांना कामावर जाण्यासाठी उशिर होत आहे.
एकाचा मृत्यू -