ठाणे - कल्याण लोहमार्ग न्यायालयात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह इतर आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत शेकडो मनसेच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर व रेल्वे पोलीस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे सोडून पोलिसांनी पत्रकारांनाच टार्गेट करीत त्यांना धक्के मारत बाहेर काढले. विशेष म्हणजे न्यायाधीशांनीही बाहेरची गर्दी पाहून सुनावणीदरम्यान हा प्रश्न उपस्थित केल्याची माहिती खुद्द मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकाराला दिली. त्यामुळे दुपारनंतर सुनावणीदरम्यान लोहमार्ग न्यायालय बाहेरील मनसैनिकांची गर्दी त्यांच्याच नेत्याकडून हटवण्यात आली. मात्र त्यावेळीही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.
रेल्वे पोलिसांचा कारनामा; मनसैनिकांना सोडून पोलीस धावले पत्रकारांवर
रेल्वे कायदाभंग आंदोलन करतेवेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चार मनसेच्या नेत्यांनी विनातिकीट रेल्वेत प्रवास करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वे पोलिसांना आव्हान दिले होते. लोहमार्ग पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेत हा व्हिडीओ कर्जत ते शेलू रेल्वे स्थानकादरम्यान असल्याचे समोर आले. त्यामुळे कालच संदीप देशपांडे यांच्यासह चार मनसेच्या नेत्यावर रेल्वे कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याने स्वतः संदीप देशपांडे व त्यांचे कार्यकर्ते कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः ला अटक करून घेतली होती.
आज कल्याणच्या लोहमार्ग न्यायालयात आरोपी संदीप देशपांडे 4 मनसेच्या नेत्यांना दुपारी अकरा वाजता हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे विविध प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी वृत्तसंकलन करण्यासाठी न्यायालयाबाहेर उभे होते. तसेच मनसे नेते संदीप देशपांडे कल्याण लोहमार्ग न्यायालयात येणार असल्याची खबर मनसैनिकांना लागल्याने मनसैनिकांनी लोहमार्ग न्यायालयाबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत एकच गर्दी केली होती. तर काही कार्यकर्त्यांनी तर घोषणाबाजीही केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याचे पाहता न्यायाधीशांनीही यावर आक्षेप घेतला होता. यामुळे स्वतः संदीप देशपांडे व इतर नेत्यांनी मनसैनिकांना लोहमार्ग न्यायालयाबाहेर गर्दी करू नका म्हणून सांगितले. मनसैनिकांनी या ठिकाणाहून गर्दी कमी करत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.
दीड वाजता सुरू झालेल्या न्यायालयीन कामकाजादरम्यान न्यायाधीशांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेसह चारही नेत्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पुन्हा सायंकाळी चारच्या नंतर न्यायालयाचे कामकाज सुरू होऊन संदीप देशपांडे सह चारही नेत्यांना पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास पुढील जामिनाच्या कागदोपत्री कामांसाठी पुन्हा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात संदीप देशपांडे यांना लोहमार्ग पोलीस घेऊन आले. त्यावेळी अकरा वाजल्यापासून 15 ते 20 पत्रकार संदीप देशपांडे यांच्या वृत्तसंकलनासाठी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ताटकळत होते.
दरम्यान, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांना बाईट दिला. त्यानंतर पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की करीत लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढले. यामुळे काही काळ पत्रकार आणि पोलिसांमध्ये बोलाचाली झाली होती. काही पत्रकारांनी तर पोलिसांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालू असे सांगताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. मात्र शेकडो मनसैनिकांकडून लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या आवारातच पत्रकारांची संदीप देशपांडे बोलल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत हारतुरे देऊन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी बघ्याची भूमिका घेतली होती. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा पत्रकारांमध्ये रंगली आहे.