ठाणे -भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आदिवासी महिलांचे प्रश्न आणि समस्या जैसे थेच असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे सचिव व उपनेते आदेश बांदेकर यांनी केले. माऊली संवाद यात्रेनिमित्ताने भिवंडीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आदिवासी महिलांचे प्रश्न जैसे थे वैसे - आदेश बांदेकर - उपनेते
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आदिवासी महिलांचे प्रश्न आणि समस्या जशा होत्या तशाच आहेत. असे वक्तव्य शिवसेनेचे सचिव व उपनेते आदेश बांदेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
माऊली संवाद यात्रेनिमित्ताने भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या कंदळी या गावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांसोबत संवाद साधत असताना आदेश बांदेकर यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरी आजही आदिवासी महिलांच्या समस्या काही सूटल्या नाहीत. खऱ्या अर्थाने नागरी समस्यांना या आदिवासी महिलांना सामोरे जावे लागत आहे. आदिवासी भागातील महिलांसोबत संवाद साधण्यासाठी माऊली संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या उपक्रमात ग्रामीण भागातील महिला ज्या आत्मविश्वासाने प्रश्न मांडत आहेत, त्याच तत्परतेने त्यांच्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर राहणार असल्याचा विश्वास बांदेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
माऊली संवाद यात्रेनिमित्ताने जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती वैशाली चंदे यांच्यावतीने उपस्थित महिलांच्या नावे लकी ड्रॉ काढून बांदेकर यांच्या हस्ते पाच भाग्यवान महिलांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान आदिवासी महिलांनी घरकुल, पिण्याचे पाणी, बोरवेल , रस्ते, आरोग्य या प्रमुख समस्या मांडल्या. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी या समस्या लवकरच सोडण्याचे आश्वासन दिले आहे.