ठाणे- तब्बल सात ते आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर लोकमान्यनगर परिसरातील नाल्याच्या भिंतीमध्ये अडकलेल्या अजगराला वाचविण्यात प्राणीमित्र आणि फायर ब्रिगेडला यश आले आहे. काँक्रीट कटर आणि ड्रिलच्या साहाय्याने या अजगराला नाल्याच्या बाहेर काढण्यात आले. अजगर नऊ फुटाचा सांगितला जात असून बाहेर काढल्यानंतर त्याला वन विभागाकडे सोपवण्यात आले आहे.
तब्बल आठ तासानंतर अजगराची सुटका - गणपती मंदिर
तब्बल सात ते आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर लोकमान्य नगर परिसरातील नाल्याच्या भिंतीमध्ये अडकलेल्या अजगराला वाचविण्यात प्राणीमित्र आणि फायर ब्रिगेडला यश आले आहे. अजगर नऊ फुटाचा सांगितला जात असून बाहेर काढल्यानंतर त्याला वन विभागाकडे सोपवण्यात आले आहे.
लोकमान्य नगर पाडा नं.४ येथील गणपती मंदिराच्याजवळ असलेल्या चाळीला लागून नाला आहे. सकाळी ७ च्या सुमारास नाल्याला लागून असलेल्या घरामधून एक महिला जेव्हा कचरा टाकण्यासाठी बाहेर आली, तेव्हा नाल्याच्या आउटलेटमध्ये हा अजगर फसला असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर स्थानिक नागरिक आणि प्राणीमित्रांच्या मदतीने या अजगराला वाचविण्याचे काम सुरु करण्यात आले. सुरुवातीला प्रयत्न करूनही हा अजगर बाहेर काढता न आल्याने तो स्वतःहून जाईल असा विचार करण्यात आला होता. त्यामुळे काही वेळ बचावकार्य थांबविण्यात आले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास अजगराला दुखापत होऊ शकते, असा विचार करून पुन्हा बचावकार्य करण्यास सुरुवात करण्यात आली. अजगर हा ड्रेनेजमध्ये असलेल्या शिंगांमध्ये फसला होता. याशिवाय अजगराने उंदीर खाल्ल्याने त्याला हालचाल देखील करता येत नव्हती. त्याचबरोबर, झोपडपट्टीचा भाग असल्याने अजगराला पाहण्यासाठी गर्दी जमली होती. त्यामुळे बचावकार्यास अडथळा येत होता.
अजगराला बाहेर काढण्यात वाहतूक विभागात कार्यरत असलेले आणि प्राणीमित्र असलेले शिरसाठ हे सुरुवातीपासूनच प्रयत्न करत होते. मात्र, दुपारनंतर फायर ब्रिगेडने नाल्याच्या बाहेरून आणि आतून काँक्रीट कटर आणि ड्रिलच्या साहाय्याने खड्डा करून जागा मोकळी केली. आणि या अजगराला बाहेर काढण्यात आले. हा अजगर इंडियन रॉकजातीचा असून त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. उंदीर खाण्याच्या शोधात अजगर येत असल्याचे प्राणीमित्र शिरसाठ यांनी संगीतले आहे.