ठाणे- पल्स पोलिओ लसीकरण मोहीम बालकांसाठी अतिशय आवश्यक आहे. कोरोना काळामध्ये त्याची अधिक आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत लसीकरण टाळू नका. प्रत्येक ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस द्या, असे आहावन भिवंडी पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे.
२०२० या वर्षातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात आयुक्त पंकज आशिया यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात पार पडली. येथे डॉक्टर आशिया म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत शून्य ते पाच वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पल्स पोलिओ मोहीम चांगल्या प्रकारे शहरात राबवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करायची आहे. आज व या पुढील ५ दिवस, म्हणजेच २१ ते २५ तारखेच्या दरम्यान वैद्यकीय विभागातील कर्मचारी पथक घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण करणार आहे. त्यावेळी त्यांना सहकार्य करावे व आपल्या घरातील सर्व पाच वर्षापर्यंतच्या मुलांना पल्स पोलिओ लस देण्यात यावी, असे आवाहन आयुक्त आशिया यांनी केले.