ठाणे- देह व्यापार करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीची अज्ञातांनी गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
धक्कादायक ! देहव्यापार करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची अज्ञात ग्राहकांकडून हत्या - bhiwandi crime news
भिवंडीत देहव्यापार करणाऱ्या एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. तिच्याकडे आलेल्या तीन ग्राहकांनी ही हत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हत्येपूर्वी तरुणीला इजा पोहोचवून तिचा गळा आवळण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय तरुणीची भिवंडीतील आसबीबी परिसरात असलेल्या हनुमान टेकडी या भागात राहून देहव्यापार करत होती. गुरुवारी रात्रीच्या सुमाराला या मृत तरुणीच्या खोलीत तीन ग्राहक आल्याची माहिती सांगण्यात आली. त्यामुळे या अज्ञात ग्राहकांवर तिच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. देहव्यापार करणाऱ्या या तरुणीच्या गुप्तांगास इजा पोहोचवून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर तरुणीचा मृतदेह विच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला.
शुक्रवारी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी दिली.