ठाणे- शहरात दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. हे त्रिकुट दुचाकीच्या हँडलला पायाने जोरदार झटका देऊन लॉक तोडायचे आणि गाडी लंपास करायचे. आरोपी चोरीच्या दुचाक्या स्वत:च चालवायचे आणि ज्या ठिकाणी दुचाकीतील पेट्रोल संपले त्या ठिकाणी ती सोडून द्यायचे, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
अनुराग विजय आढारी (वय.१९, रा. खुंटवली, अंबरनाथ) सुनील भगवान काळे उर्फ सुनील गुंडाळे (वय.२१ रा. म्हारळगाव) विजय वेंकटी जाधव उर्फ विजू (वय.२५ रा. म्हारळगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अंबरनाथ येथील मटका चौकात काही आरोपी चोरीची दुचाकी घेऊन येत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मटका चौकात सापळा रचून आरोपी अनुराग याला अटक केली. अनुरागने आपण अल्पवयीन साथीदारासह उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातून अनेक दुचाकी लंपास केल्याची कबुली दिली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने अनुरागकडून अधिक माहिती काढून आरोपी सुनील काळे उर्फ गुंडाळे, विजय वेंकटी जाधव उर्फ विजू या दोघांना अटक केली. या दोघांनीही पोलिसांना उल्हासनगर, कल्याण, नवी मुंबई परिसरातील दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे.