ठाणे :भिवंडीत सुरू असलेल्या खासगी शाळांमध्ये सध्या गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका इंग्रजी शाळेच्या बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत किरकोळ कारणावरुन शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे पालकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना :पोलिस आणि इतरांच्याकडूनमिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील जुना आग्रा रोड परिसरात असलेल्या एका खासगी इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी दोन अल्पवयीन सख्या बहिणी रोज बसमधून शाळेत येत होत्या. त्यावेळी बस कंडक्टर या विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य करत असे. दरम्यान ५ ऑगस्टलाही बसमधून शाळेतून घरी जात असताना विद्यार्थिनींसोबत बस कंडक्टरने अश्लील वर्तन केले. घरी पोहोचताच विद्यार्थिनींनी आपल्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबीयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन बस कंडक्टरवर विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बस कंडक्टरचा शोध घेऊन त्याला अटक केली. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वीही आरोपीने निरपराध विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केले होते. याबाबत शाळा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र तक्रारीनंतरही त्या बस कंडक्टरमध्ये सुधारणा झाली नसल्याने त्याचे प्रकार वाढतच चालले होते.