ठाणे - घरचा जेवणाचा डबा घेऊ देण्यास मज्जाव केल्याच्या रागातून कैद्याने चक्क पोलिसाच्या अंगावर थुंकत करंगळीचा चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मोहम्मद सोहेल मन्सुरी (वय 26 रा. नळबाजार, मुंबई) असे त्या कैद्याचे नाव असून शुक्रवारी त्याच्यासह इतर ८ न्यायबंदीना ठाणे मध्यवर्ती कारागृहातून मुंबईतील दिंडोशी न्यायालयात सुनावणीवरून परतत असताना ठाण्यात हा प्रकार घडला. मन्सुरीने पोलीस वाहनातच शिवीगाळ करून पोलिसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याने त्याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या बंदीवानांना सुनावणीसाठी दिंडोशी न्यायालयात घेऊन जाण्याची जबाबदारी कल्याण, खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कदम व त्यांच्या पथकावर सोपवण्यात आली होती. यात नळबाजार येथील एका गुन्ह्यातील आरोपी मन्सुरी याचाही समावेश होता. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी न्यायालयीन प्रक्रिया आटोपून दिंडोशी न्यायालयातून ठाणे कारागृहात परतत असताना मन्सुरी याच्या नातलगांनी मन्सुरी याला घरच्या जेवणाचा डबा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपनिरीक्षक कदम यांनी आक्षेप घेत सर्व बंदीवानांना सरकारी भत्ता मिळतो, असे सांगितल्याने त्याचा मन्सुरीला राग आला. त्याने पोलिसांच्या वाहनामध्ये शिवीगाळ करून हुज्जत घालत उपनिरीक्षक कदम यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.