महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Financial Fraud Thane : पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक; परराज्यातील टोळीला अटक - आर्थिक फसवणूक ठाणे

पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून असली नोटा घेऊन कागदी बंडल देणाऱ्या परराज्यातील टोळीला कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. इशाख शरफ शेख (वय ४० ) सोफीकुल लोन शेख (वय ४२), इम्रान मोहम्मद इक्बाल खान (वय ३० ) आणि महिला हमीदाबीबी जाफरअली गाजी (वय ४८) असे अटक केलेल्या टोळीचे नाव असून हे आरोपी मूळचे उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल मधील रहिवाशी आहेत.

Financial Fraud Thane
परप्रांतीय टोळीला अटक

By

Published : Jan 15, 2023, 5:04 PM IST

परप्रांतीय टोळीच्या फसवणुकीच्या पद्धतीची माहिती देताना पोलीस

ठाणे :तक्रारदार अझीम इस्माईल कर्वेकर (वय ५५) हे ठाण्यातील राबोडी परिसरात राहतात. त्यांची काही दिवसापूर्वी आरोपी महिला हमिदा हिच्याशी रिक्षा प्रवासात ओळख झाली होती. ओळखी दरम्यान त्या महिलेने आम्ही हातोहात दुप्पट पैसे करून देतो, अशी थाप मारून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर त्या महिलेने वारंवार त्यांना मोबाईलवर संपर्क केला. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार अझीम यांनी ४ जानेवारी २०२३ रोजी आरोपी महिलेने सांगितल्याप्रमाणे पैसे देण्यास तयार झाले.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल :आरोपी महिलेच्या सांगण्यावरून तिच्या अनोळखी साथीदारांनी कर्वेकर यांना शिवाजी कॉलनी रोड, भाजी मार्केट कोळसेवाडी कल्याण पूर्व येथे बोलावून यांच्याकडून १ लाख ८० हजार रूपये रोख घेतले. त्याबदल्यात त्यांना एका पिशवीमध्ये कागदांच्या तुकड्यांचे बंडल देऊन चारही आरोपी पळून गेले. काही वेळाने त्यांनी पिशवीत बघितले असता, नोटांच्या ठिकाणी कागदाचे बंडल आढळून आल्याने त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

इतर प्रकरणही आले समोर :दाखल गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेंद्र देशमुखसह सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे, सहा पोलीस निरीक्षक बोचरे यांच्या पथकातील कर्मचारी यांनी गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींनी तक्रारदाराशी संपर्क केलेल्या मोबाईल नंबरचे सीडीआर प्राप्त करून त्याआधारे तपास करीत असताना आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून ज्या व्यक्तीला जास्तीत जास्त संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार त्याची भिवंडी येथे भेट घेतली असता नुरमोहम्मद शेख यांनाही आरोपींनी सौदी अरबचे चलन रियाल देऊन त्याबदल्यात पैसे मागितले होते; परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी आरोपींकडून रियाल घेण्यास नकार दिला होता.

असा रचला सापळा :यानंतर नुरमोहम्मद शेख यांनाच पोलीस पथकाने आरोपीला मोबाईलवर संपर्क साधण्यास सांगून पैशांची पूर्तता झाल्याचे सांगितले आणि पैसे देण्यासाठी कोठे भेटायचे असे विचारण्यात सांगितले. त्यानुसार नूर मोहम्मद शेख यांनी ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळच्या सुमारास कोळसेवाडी, कल्याण पूर्व येथे भेटण्यास बोलविले. त्या अनुषंगाने सपोनि पगारे व सपोनि बोचरे आणि तपास पथकाने या ठिकाणी सापळा रचला असता, तिन्ही आरोपींना शिताफीने पकडले. तर या गुन्ह्यातील साथीदार महीला हमीदाबीबी हिला पश्चिम बंगालमधून राहत्या घरातून अटक करून १ लाख ७० रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या चाळीत असलेल्या भाड्याच्या खोलात राहत होतो.

हेही वाचा :UP Crime : मद्यधुंद पतीने गर्भवती पत्नीला दुचाकीला बांधून ओढत नेले, महिलेची प्रकृती चिंताजनक

ABOUT THE AUTHOR

...view details