ठाणे- महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे. आडनाव समान असल्याने एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह देण्यात आला आहे. यामुळे महिलेला नाहक त्रास सहन करावा लागला असून महिलेच्या नातेवाईकांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
निगेटिव्ह गर्भवतीचा अहवाल दिला पाॅझिटिव्ह, ठाण्यातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आला आहे. आडनाव समान असल्याने एका नऊ महिन्याच्या गरोदर महिलेचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनाची चाचाणी केल्यानंतर गर्भवती महिलेला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह देण्यात आला. त्यामुळे महिलेच्या घरातील सर्वांनाच क्वारंटाइन करण्यात आले. तसेच गर्भवती महिलेला नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, नायर रुग्णालयात गेल्यावर या महिलेचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह नसून समान आडनाव असलेल्या दुसऱ्या महिलेचा तो अहवाल असल्याची माहिती समोर आली. या सर्व प्रकारात त्या गर्भवती महिलेलेला नाहक त्रास सहन करावा लागला.
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ता मंगेश जोशी यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन या महिलेला आधार दिला. महिलेला परत रुग्णवाहिकेतून ठाण्यात आणले. हा प्रकार मंगेश यांनी सोशल मीडियाद्वारे प्रसारित केला. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी कळवा रुग्णालयात महिलेला दाखल केले आहे. संबंधित महिला कशेळी परिसरातील राहणारी आहे.