ठाणे- सध्या कल्याण डोंबिवलीत कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता, ठाण्यात शिवसेनेचे मंत्री, कल्याणात शिवसेनेचा खासदार, आमदार, महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असूनही केवळ राजकीय इच्छाशक्ती आणि समन्वयाअभावी ही परिस्थिती आली आहे. अशात येत्या 8 दिवसांत कल्याण डोंबिवलीतील परिस्थिती सुधारली नाही, तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी आज महापालिका आयुक्तांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयालाही भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील व्यवस्था आणि समन्वयाच्या अभावामुळे कल्याण डोंबिवलीत मृत्यू वाढत चालल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला. महानगरपालिका आणि राजकीय नेतृत्वामध्ये ताळमेळ नाही. ऑक्सिजन, व्हेंटीलेटरसाठी जास्त निधी लागत नाही. मात्र, त्यासाठीही महापालिका उपाययोजना करू शकत नाही. हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.