ठाणे - भीमा कोरेगाव प्रकरणात माझ्या गटाच्या 80 टक्के कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच हे आंदोलन प्रकाश आंबेडकर यांना यशस्वी करण्यात सफलता मिळाली. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोठ्या प्रमाणात मते मिळवली, असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या कल्याण येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
आठवले पुढे म्हणाले की, "मी केंद्रात मंत्री असल्याने भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात मला सहभागी होता आले नव्हते. मात्र, मी माझ्या कार्यकर्त्यांना सहभागी व्हायला सांगितल्याने भीमा कोरेगाव आंदोलन यशस्वी झाले. आजही आपण रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्नशील असून प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मला मान्य आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, तसा मीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही"