सोलापूर- राज्यात सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. कर्जमाफीची घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न राज्यात दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, या प्रश्नांकडे शासनाचेलक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रहारने 'जेलभरो आंदोलन' सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापुरातही प्रहार पदाधिकऱ्यांनी आंदोलन केले.
राज्यातील शेतकऱ्यांना जर प्रत्यक्षात कर्जमाफी मिळाली असती, तर शेतकरी राजा सुखी बनला असता आणि शेतकऱ्यांचा विकास झाला असता. मात्र, सरकारचे 'खायचे दात एक आणि दाखवायचे एक' त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे प्रहारने राज्यभरात जेलभरो आंदोलन सुरू केले आहे. तसेच वेळ पडलीच तर युती सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.