ठाणे : आदी नोटबंदी त्यानंतर सीएसटी आणि आता लॉकडाऊनमुळे मंदीच्या यंत्रमाग व्यवसाय सापडला आहे. २० हजार कोटींचे वार्षिक टर्न ओव्हर आणि प्रतिदिन ३ कोटी मीटर सुती कापडाचे उत्पादन करणाऱ्या भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यवसायाला लॉकडाऊनमुळे सुमारे ५ लाख यंत्रमागांची धडधड ठप्प झाल्याने कापड उद्योग शेवटची घटका मोजू लागला आहे.
जीवघेण्या कोरोना व्हायरसने डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात थैमान घालून हजारो नागरिकांचे बळी घेतल्याचे जगासमोर आले. त्यानंतर जागतिक पातळीवर या कोरोनाने थैमान घातल्याने अनेक देशांनी चीन देशाशी आयात निर्यात बंद केली. त्यामुळे चीनचा वस्त्रोद्योग व्यवसायासोबतच अन्य व्यवसायातील दबदबा कमी झाला. ही संधी भारताच्या पथ्यावर पडणारी होती. भारतात देशांतर्गत व अरब राष्ट्रांमध्ये सुती कापडाची मागणी वाढू लागली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून मंदीच्या विळख्यात सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला सुगीचे दिवस येणार असे कापड व्यावसायिकांना वाटत होते. मात्र याच काळात कोरोनाने भारतातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यामुळे सतर्क झालेल्या केंद्र व राज्य सरकारांनी जीवितहानी टाळण्यासाठी तात्काळ जमावबंदी ,संचारबंदी व त्यापाठोपाठ राज्य ,जिल्हा ,तालुका व गांव पातळीवर सीमा (लॉकडाऊन) सीलबंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
मात्र या निर्णयामुळे भिवंडी शहर व ग्रामीण परिसरातील ५ लाख यंत्रमागांची धडधड ठप्प झाली आहे. देशभरातील सुती कापड निर्यात भिवंडी शहरातून ७ टक्के केली जात होती. ती आता ३ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. आशिया खंडासह फ्रांस ,इटली ,अमेरिका ,रशिया आदी देशांमध्येदेखील भिवंडीतील सुती कापड निर्यात केले जात होते. तर लॉकडाऊनमुळे यंत्रमाग कारखाने बंद ठेवावे लागले आहेत. या व्यवसायाशी निगडीत असलेले साखळी पद्धतीने चालणारे छोटे व्यावसायिक जसे बीम चालक, वारपीन ,ट्विस्टिंग, डबलिंग ,वाईडींग ,फोल्डिंग, साईजिंग ,प्रोसेस हाऊस ,ट्रान्सपोर्ट आदी हजारो नागरिक बेरोजगार झाले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचा रोजगार एका झटक्यात हातचा निघून गेल्याने शेकडो कुटुंबांवर रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे चार लाख कामागरांपैकी २ लाख कामगारांनी लॉक डाउनच्या पूर्वीच आपले घर गाठले आहे. तर २ लाख कामगार आजही भिवंडीत अडकून पडले आहेत.
जर १४ एप्रिलला लॉकडाऊन उठवण्यात आले तर हे अडकलेले यंत्रमाग कामगार आपल्या कुटुंबियांच्या व्याकुळतेने त्यांना भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आपले घर गाठण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे कामगारांअभावी लॉकडाऊन संपल्यावरदेखील यंत्रमाग व्यवसाय सावरेल याची सुतराम शक्यता वाटत नाही. भिवंडी शहराची मुख्य ओळख यंत्रमाग नगरी म्हणून अशी आहे. मात्र सद्य स्थितीत संपूर्ण यंत्रमाग कारखाने बंद असल्याने शहराची अर्थ व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यंत्रमाग व्यवसायासाठी विशेष पॅकेज घोषित करून यंत्रमाग व्यासायिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.