ठाणे -कळवा आणि पडघा जिआयएस (GIS) केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सकाळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कल्याण परिमंडळातील २ लाख ६५ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. पालघर विभागात तातडीने परिस्थिती हाताळून अवघ्या २२ मिनिटात वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले. तर कल्याण पूर्व व पश्चिम भागात सायंकाळी साडेपाचपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व ग्राहकांचा व वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तत्परतेने काम केल्याचे सांगण्यात आले. कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-१ व केबी-२ हे दोन फिडर सकाळी १० वाजून ५ मिनिटापासून बंद झाले होते.
तांत्रिक बिघाडामुळे बाधित सर्व भागांचा वीजपुरवठा सायंकाळपर्यत सुरळीत - पालघर वीजपुरवठा बातमी
टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-१ व केबी-२ हे दोन फिडर सकाळी १० वाजून ५ मिनिटापासून बंद झाल्याने वीजपुरवठा बाधित झाला होता. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करत परिस्थिती पूर्वपदावर आणली.

केबी-२ फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. तर केबी-१ फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील ९० फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. या फिडरवरील शक्य त्या वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले. सकाळी सव्वाअकरापर्यंत १६ हजार तर दुपारी सव्वाबारापर्यंत ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला.
याशिवाय पालघर विभागात २० उपकेंद्र बाधित होऊन जवळपास २ लाख ५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी दहा वाजता बाधित झाला. तत्परतेने आवश्यक कार्यवाही करून अवघ्या २२ मिनिटात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. कल्याण मंडळ एकचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे व पालघर मंडळाच्या अधीक्षक अभियंता किरण नगांवकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांना गती दिली. तर कल्याण व पालघरमधील अल्प कालावधी वगळता कल्याण परिमंडळात इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली.