ठाणे- क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन बुधवारी (दि. 4 नोव्हेंबर) "माझा रस्ता माझी जबाबदारी" हा उपक्रम राबवून खड्डे बुजविण्याचे आवाहन श्रमजीवी संघटनेने सोशल मीडियावरकेलेहोते. त्याला प्रतिसाद देत, भिवंडी तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन भिवंडी-वाडा, मनोर महामार्गावरील खड्डे श्रमदानाने भरले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला चपराक बसली असल्याचे बोलले जाते.
मोठे खड्डे असल्याने या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना आपला जीव मुठित ठेवून प्रवास करावा लागत होता. तसेच या मार्गावर सतत लहान-मोठे अपघात व्हायचे. या खड्ड्यांविरोधात यापूर्वीही श्रमजीवी संघटना आणि स्थानिक तरुणांनी अनेक आंदोलने केली आहेत.
आंदोलन करून टोल नाका पडला होता बंद
गेल्या वर्षी डॉ. नेहा शेख या तरुणीचा या महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्यावर तरुणांनी आंदोलन करत या रस्त्यावरील कवाड येथील टोलनाका बंद केला होता. पण, आजही या मार्गात काहीही बदल झालेला नाही. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष आहे.