ठाणे- विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. मात्र रविवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. तरी देखील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामधून सर्व अधिकारी, कर्मचारी आपआपल्या मतदान केंद्राकडे निवडणूक साहित्य घेऊन रवाना झाले. शनिवारी पडलेल्या पावसात देखील कर्मचाऱ्यांना चिखल तुडवत बसपर्यंत जाऊन पुढे मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे लागले. मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी देखील पावसाने हजेरी लावली तर मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम मतदारसंघासोबतच भिवंडी ग्रामीण या तीनही विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय भिवंडी येथे आहे. त्यामुळे मतदानासाठी मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण करण्याच्या हेतूने तब्बल २४ तासापूर्वीच रविवारी सर्व मतदान केंद्र अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर मतदान केंद्रावरील सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
भिवंडी शहरातील वऱ्हाळा माता मंगल भवन, स्व. संपदा नाईक सभागृह भादवड तसेच मिल्लत नगर येथील फरहान हॉल येथे सकाळपासूनच अधिकारी व कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या ताब्यातून मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन व इतर साहित्य तपासून घेण्यात आली.