ठाणे:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी माने आणि त्याची बायको कल्याण पूर्वे कडील विजयनगर परिसरातील एका सोसायटीत राहते. त्यातच रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करण्यात आला. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर भागात असलेल्या एका सोसायटीत नवरा-बायकोमध्ये वाद झाल्याचा फोन आला. नवरा आपल्या बायकोला शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सांगण्यात आले. तसेच त्या महिलेला मदतीची गरज असल्याने तातडीने त्याठिकाणी जाण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी हवालदार घुगे आणि सांगळे यांना दिल्या होत्या.
पोलिसांनाच मारहाण आणि शिवीगाळ: त्यानुसार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस हवालदार सोसायटीत पोहोचल्यानंतर त्या महिलेच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी महेश माने हा बायकोला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तिला बेदम मारहाण करत होता. हवालदार घुगे आणि सांगळे यांनी आरोपी महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले; मात्र तुम्ही मला सांगणारे कोण? असा प्रश्न करत आरोपी महेशने पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांना घराबाहेर हाकलून लावले. त्यानंतर सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकीवर हवालदार घुगे यांना जोरदार धक्का दिला. यात हवालदार घुगे यांना गंभीर दुखापत झाली.