ठाणे : १५ जून पासून शाळा, महाविद्याल सुरू होताच नशेखोरीचा गोरखधंदा करणारे शाळा, महाविद्याल परिसरात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय डोंबिवली स्टेशन परिसर व सार्वजनिक ठिकाणी सिगरेट तंबाखू सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. केवळ दोन तासात ५० जणांवर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू सेवन केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याची बजावली नोटीस आहे. तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सहा जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
पोलिसांची कडक कारवाई -डोंबिवली शहराची संस्कृतिक नगरी म्हणून जगभरात ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली व आसपासच्या परिसरात पोलिसांनी गांजा , चरस, एमडी पावडर अश्या अंमली पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करून नशेखोरीचा गोरखधंदा करणाऱ्या तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र तरी देखील डोंबिवलीच्या काही भागात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या छापेमारीतून उघडकीस आले. त्यामुळे डोंबिवली शहर नशामुक्त करण्यासाठी विशेष मोहिम शहारत पोलिसांकडून राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आता रसार्वजनिक स्त्यावर उभे राहून सिगारेट ओढणंही महागात पडणार आहे.
नशा करणाऱ्यांना थेट न्यायालयात हजर करणार -गेल्या काही दिवसांपासून नशामुक्त शहर करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध मोहिम राबवली जात असतानाच, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली पोलिसांकडून विशेष मोहिम राबवली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची नशा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून रस्त्यावर कुठेही उभं राहून सिगारेट ओढणाऱ्यांनाही आणि गुटखा , तंबाकू खाणाऱ्यावर आता चाप बसणार आहे. अशी कोणत्याही नशा करणाऱ्यांना थेट न्यायालयात हजर केलं जाणार आहे.