ठाणे -पुलावरून नदीत उडी मारत आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱ्या एका वृद्ध महिलेचे कल्याण तालुका पोलिसांनी प्राण वाचवल्याची घटना समोर आली. ही घटना कल्याण-मुरबाड रोडवरील पुलावर घडली. प्राण वाचलेल्या वृद्ध महिलेची पोलिसांनी समजूत काढत तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण - ठाणे महिला आत्महत्या प्रयत्न
अनेकदा काही कारणास्तव आत्महत्या करण्याचा विचार आपल्या मनात येऊ शकतात. काही व्यक्ती हे नकारात्मक विचार बाजूला सारण्यात यशस्वी होतात. मात्र, काही व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. ठाण्यामध्ये अशाच एका आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.
पेट्रोलिंगमुळे समोर आला प्रकार -
कल्याण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी व पोलीस उपनिरीक्षक कमलाकर मुंडे आपल्या कर्मचाऱ्यांसह रायते परिसरात पहाटेच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. त्यांची व्हॅन रायते पुलाजवळ पोहोचली असता, पथकाचे लक्ष या ६० वर्षीय महिलेकडे गेले. ही महिला पुलाच्या संरक्षक कठडा चढून नदीत उडी मारण्याच्या प्रयत्नात होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वंजारी यांनी प्रसंगावधान राखत या महिलेला कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाचवले. या महिलेची समजूत काढली व त्यानंतर महिलेला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या वृद्ध महिलेचा जीव वाचला असून महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.