ठाणे - भिवंडी महसूल पथक व कोनगांव पोलिसांच्या सहायाने गुरूवारी दिवसभर कोनगांवच्या खाडीपात्रात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ सक्शन पंप व २ लोखंडी बार्ज, असा तब्बल ६६ लाख १५ हजार रुपये किंमतीचे यंत्रसामुग्री जप्त करण्यात आले. तसेच यंत्रसामुग्री त्याच ठिकाणी गॅस कटरच्या सहायाने मोडीत काढण्यात आले आहेत. यावेळी जलयानावरील रेतीमाफियांना महसूल पथकाच्या कारवाईचा सुगावा लागताच चौघे रेती माफिया पाण्यात उड्या घेतल्या आणि पोहत तिवरांच्या झुडुपात पसार झाले.
कोनगाव खाडीपात्रातील रेती माफियांवर धडक कारवाई; 66 लाखांची यंत्रसामुग्री जप्त, 4 आरोपी पसार - यंत्रसामुग्री
महसूल विभागाचे पथक आणि पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल 66 लाख 15 हजार रुपये किंमतीचे यंत्रसामुग्री जप्त करण्यात आले आहे. बेकायदेशीर रेती उपसा करणाऱ्या माफियांवर ही कारवाई करण्यात आली.
![कोनगाव खाडीपात्रातील रेती माफियांवर धडक कारवाई; 66 लाखांची यंत्रसामुग्री जप्त, 4 आरोपी पसार POLICE RAID ON RETI MAFIYA IN THANE](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5505036-272-5505036-1577392671451.jpg)
रेती उत्खननासाठी राज्य शासनाची कोणतीही परवानगी नसताना कोनगाव खाडी पात्रात बेकायदेशीरपणे रेती उपसा सुरू आहे. रेती माफिया सक्शन पंप व लोखंडी बार्जद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करतात. या अवैध उपशाची गुप्त माहिती भिवंडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर व तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी खाडी पात्रातील अवैध सक्शन पंपांवर कारवाई करण्याचे आदेश निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे, महेश चौधरी, मंडळ अधिकारी चंद्रकांत रजपूत आणि अंजूर सजेचे तलाठी बुधाजी हिंदोळा आदी महसूल पथकाला दिले होते. त्यानुसार भिवंडी तहसील महसूल पथक व कोनगांव पोलिसांच्या सहायाने गुरूवारी दिवसभर कोनगांवच्या खाडीपात्रात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४ सक्शन पंप व २ लोखंडी बार्ज असा ६६ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात रेती माफियांच्या विरोधात भादवि कलम ३७९, ४३९, ३४ सह महाराष्ट्र्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७), ४८ (८) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार रेती माफियांचा कोनगांव पोलीस कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. महसूल विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.