ठाणे :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील धामणकर नाका येथील अजंठा कंपाउंड जवळील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएमच्या मागील गल्लीतील एका लूम कारखान्याच्या गाळ्यात 'किंग' नावाच्या ऍप्लिकेशन ऑनलाइनच्या नावाने संगणकावर रॉलेट ऑनलाईन जुगार खेळला जात आहे. याची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी सदर जुगार अड्ड्यावर शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास छापा टाकून उमेश साधूशरण गुप्ता,आतिक रहमान अन्सारी, ध्रुव मानसुखलाल मालदे ,तामिल शहामोहमद फारुकी, या चौघांना रंगेहाथ ऑनलाईन जुगार खेळताना पकडून त्यांच्याकडून २ कॉम्पुटर आणि २ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
जुगाराच्या आहारी गेलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचा भरणा अधिक :याप्रकरणी पोलीस नाईक उमेश चंद्रभान नागरे यांच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करून या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे करीत आहेत. दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑनलाइनच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांतील माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन जुगार खेळाकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी बहुतांश टीव्ही चॅनेलवर प्रसिद्ध अभिनेते, मॉडल हे जाहिरातीत झडकत असताना दिसत आहे. यामुळे अशा जुगाराच्या आहारी गेलेल्यांमध्ये शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे.