ठाणे- बदलापूर नजीकच्या जंगलात कुळगाव पोलिसांनी भर पावसात मोठ्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून गावठी दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी यावेळी तिघा दारू माफियांना अटक केली आहे.
भर पावसात गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
बदलापूर नजीकच्या जंगलात कुळगाव पोलिसांनी गावठी हातभट्टीवर छापा टाकला. याठिकाणी पोलिसांनी गावठी दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रामआचल यादव (वय 42), पटवारी यादव (वय 30) व विजय यादव (वय 20) असे अटक केलेल्या दारू माफियांची नावे आहेत. हे तिघेही सध्या बदलापूर नजिक चोणे गावात राहत असून ते मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत.
दारु माफिया बदलापूर जवळच्या चोणे गावाजवळ जंगलातील नाल्या लगत लपून-छपून हातभट्टीची दारु करण्याचे काम करत होते. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी सोमवारी छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टिकचे व लोखंडाचे 108 ड्रम, पस्तीस प्लास्टिक कॅन, एक हजार दोनशे वीस लिटर तयार गावठी दारू, पाण्याची मोटर, जनरेटर, तसेच दारू वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.