ठाणे - भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकून ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. या प्रकरणी दोघा केमिकल साठा करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
तिर्थराज हरिलाल पाल ( ३४ रा. फादरवाडी ,वसई ) व विरल विजय गंबीया ( २६ रा.कोटेश्वर दीप ,भांडुप ) असे गजाआड केलेल्या केमिकल माफियांची नावे आहेत. या दोघांनी पुर्णा येथील द्रौपदी छाया कंपाऊंड परिसरातील एस.पी.ठक्करच्या ए टू झेड वेअर हाऊसमधील गोदाम क्र.३ व ८ यामध्ये ज्वलनशील केमिकलचा साठा केला होता. महत्वाचे म्हणजे, त्यांनी यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
दोघेही मानवी जीवीताला व पर्यावरणास धोकादायक असलेल्या ज्वलनशील केमिकलचा साठा करून त्याची परस्पर विक्री करत होते. याची खबर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळली. तेव्हा त्यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मालोजी शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले.