नवी मुंबई - देशात आणि राज्यात लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून घरात न बसता रस्त्यावर फिरणाऱ्या महाभागांचा पोलीस यंत्रणा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यामुळे पोलीस म्हणजे कठोर अशी जनमानसात पोलिसांची प्रतिमा झाली असतानाच पोलिसांचे दुसरे रुपही पनवेलमध्ये पाहायला मिळाले. गरजू, गोरगरीब लोकांना पोलिसांनी अन्न वाटण्याचे काम केले.
घराबाहेर पडणाऱ्यांना चोप तर गरजूंना मदत... हेही वाचा-लॉक डाऊन : रत्ने आणि मौल्यवान परिषद कर्मचाऱ्यांना देणार ५० कोटींचा निधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वळगता सर्व सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेले कामगारांचे काम बंद झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. रेल्वे, बसेस त्याचबरोबर खाजगी वाहन बंद आहेत. बाजारपेठा सुरू नाहीत. उपहारगृह, वडापाव, पाणीपुरी त्याचबरोबर इतर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रस्त्यावर दिसत नाहीत. त्यामुळे बेघर आणि बिगारी काम करणारे उपाशीपोटी राहत आहेत. पनवेल भागातील अनेक भिकारी सुद्धा पोटपूजेच्या विवंचनेत आहेत. हे विदारक चित्र गस्त घालताना पोलीस उपायुक्त अशोक दुधे व सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या लक्षात आले. त्यानुसार पनवेल परिसरातील अशा व्यक्तींना सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या माध्यमातून जेवण देण्यात आले.
तर पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी गहू, तांदूळ, तेल, डाळ असे 15 दिवस पुरेल एवढे पॅकेट गरजू व्यक्तींना वाटले आहेत. पोलिसांनी दाखवलेल्या या माणूसकीमुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा तिसरा दिवस आहे.