ठाणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने शेकडो मजूर आपल्या गावाला जाण्याकरता पायपीट करत जीवघेणा प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. मुलूंड आणि ठाणेलगत असलेल्या आनंद नगर टोल नाक्यावरुनही अनेकजण गावी निघाले होते. मात्र, या ठिकाणी पोलीस अडवत असल्यामुळे पोलिसांची नाकाबंदी चुकवण्यासाठी मजूर चक्क आनंद नगर टोलनाक्यालगत असलेल्या नाल्यातून प्रवास करत होते. याबद्दल 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रकाशित करताच प्रशासनाने दखल घेऊन हा नाला दोन्ही बाजूने बंद केला आहे.
हेही वाचा -गावाची ओढ...पोलीस अडवतात म्हणून परप्रांतीय मजुरांचा चक्क नाल्यातून प्रवास
या नाल्यातून रात्री शेकडो मजूर जीव धोक्यात टाकून नाला ओलांडताना दिसले होते. त्यानंतर आज सकाळी देखील हा प्रकार सुरु होता. लोंढेच्या-लोंढे या ठिकाणाहून आनंद नगर आणि निलम नगरमधील नाल्यातून पुढे नाशिकच्या दिशेने जात होते. त्यांनतर 'ईटीव्ही भारत'च्या बातमीची दखल घेऊन पोलिसांनी या नाल्याच्या तुटलेल्या भिंती दोन्हीकडून बंद केल्या आहेत.
नाल्यातून मजुरांचा जीवघेणा प्रवास दरम्यान, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय मजूर कुटुंबांसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात जाण्यासाठी मुंबईहून निघाले आहेत. शनिवारी मुंबईहून उत्तर भारतीयांना घेऊन निघालेली चारचाकी वाहने आणि रिक्षांचे प्रमाण वाढल्याने नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा-इगतपुरी दरम्यान 5 तास वाहतूक कोंडी झाली होती.