ठाणे - मीरा भाईंदर शहरात दोन व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. त्यानुसार बोगस ग्राहक पाठवून तब्बल १६ हजाराला इंजेक्शनची विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये पोलिसांनी दोन जणांना अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपींना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा -नाहक सैरसपाटा दुचाकीस्वारांच्या अंगलट; ५३८ जणांना पावणेतीन लाखाचा दंड
एक महिला तर एका पुरुषाला अटक
मीरा भाईंदर शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे या अगोदर देखील समोर आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजाराची राज्यातील पहिली कारवाई मीरारोडमध्ये करण्यात आली होती. तशीच कारवाई काल मीरारोडमध्ये करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये दोन व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शन विकत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. त्यानुसार २० तारखेला रात्री ११.३० च्या सुमारास सापळा रचून बोगस ग्राहक पाठवून दोन व्यक्ती १६ हजाराला इंजेक्शन देत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असता इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे समोर आले आहे. एक महिला एक पुरुष असे हे दोघे नालासोपारामधील असून मेडिकल क्षेत्रात काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हा दाखल करून आज आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.