ठाणे - कल्याण पूर्वेत राहणारी एक पीडित महिला सुरक्षेसाठी डोंबिवलीतील टिळकनगर ठाण्यात गेली. मात्र, 'पुन्हा तो तुमच्याकडे आला तर आम्हाला बोलवा. आम्ही येऊन त्याच्यवर कारवाई करू', असा धक्कादायक सल्ला पोलिसांनी दिल्याची घटना समोर आली आहे. या सल्ल्यामुळे पीडित महिलांसाठी सुरक्षेबाबत असलेल्या उपाययोजनांच्या पोलीस कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महिलेला पोलिसांचा धक्कादायक सल्ला हैदराबाद, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि झारखंड येथे महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना ताज्या आहेत. आता कल्याण पूर्वेतील कचोरे गावात राहणाऱ्या पीडित महिलेला पोलिसांच्या हलगर्जीपणाचा संताप आला. या पीडित महिलेला काही दिवसांपासून एक विकृत तरुण तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत आहे. हा विकृत एवढ्याच थांबला नाही तर त्याने पीडित महिलेचे घर गाठत घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला तुझा मोबाईल नंबर दे. मी तुला मिळवूनच राहीन, असे बोलला. त्यामुळे पीडित महिलेने त्याची कॉलर पकडून मारण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी 'तू सर्वोदय मॉलजवळ ये तुला दाखवतो', अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने पीडितेसोबत धक्काबुक्की केली. यामुळे पीडित महिलेने आरडाओरडा केल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला. त्यांनतर भयभीत होऊन तिने पोलिसांच्या १०० क्रमांकावर संपर्क करून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन लागला नाही. त्यामुळे महिलेने झालेल्या घटनेची माहिती देण्यासाठी व संरक्षणसाठी स्थानिक टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, ठाणे अंमलदार यांनी पीडित महिलेच्या घटनेची नोंद घेऊन गुन्हा नोंदवला नाही. याउलट महिलेची उलट तपासणी करून घरी परत पाठवले.
ठाणे अंमलदार यांनी प्रथम अहवाल खबरनुसार गुन्हा न नोंदविता त्यांनी कलम ५०६ नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदविला. शिवाय पीडित महिलेला सांगितले, की तुम्हीच आरोपीला शोधून आणा. त्याने पुन्हा संर्पक केला, तर आम्हाला घटनास्थळी बोलवा, असे म्हणून तिला घरी जाण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. त्यामुळे पीडित महिले भयभीत होऊन प्रसारमाध्यमांकडे धाव घेत आपली व्यथा मांडली.
दरम्यान, हैदराबादमध्ये अत्याचार करून पीडितेला जाळल्याच्या भयानक घटनेमुळे कल्याण पोलीस उपायुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार कसे रोखले जातील? याविषयी मार्गदर्शन केले होते. मात्र, संबधित पोलिसांनी याचा बोध घेतला नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.