कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लुबाडणाऱ्या तिघांना अटक; 8 वर्षांपूर्वीच्या चोरीचाही लागला छडा - कल्याण चोरीच्या घटना
प्रवासी गाढ झोपेत असल्याची संधी साधून काही गर्दुल्यांनी त्याचा मोबाईल व रोकड चोरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही तपासत आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून यानिमित्ताने ८ वर्षांपूर्वीच्या चोरीचाही उलगडा झाला.
ठाणे - कल्याण रेल्वे स्थानकावर गर्दुले रेल्वे प्रवाशांना लुबाडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या.
रात्रीच्या सुमारास एक प्रवासी कल्याणच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक्स्प्रेसची वाट पाहत असताना त्याला डुलकी लागली. प्रवासी गाढ झोपेत असल्याची संधी साधून काही त्याच्या जवळील मोबाईल व रोकड चोरून गर्दुल्यांनी पळ काढला. काही वेळाने जाग आल्यानंतर प्रवाशाला मोबाईल व रोकड चोरी गेल्याचे लक्षात आले. त्याने तत्काळ याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही तपासत आरोपींची ओळख पटवली. त्यानुसार पोलिसांनी कमलकुमार ठाकूर, मोहम्मद अन्सारी, मुलायम यादव या तीन जणांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. या चोरट्यांचा एक साथीदार पसार असून त्याचाही शोध घेत आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दूल यांनी सांगितले.
8 वर्षांनी चोरीला गेलेले सोन्याचे दागिने मिळाले -
या तीन चोरट्यांकडून पोलिसांना त्यांनी आधी केलेल्या चोऱ्यांचीही माहिती मिळाली. संदीप घाग हा तरुण 2012 मध्ये कामानिमित्ताने कल्याणच्या रेल्वे ट्रॅकवरुन चालत जात असताना काही चोरट्यानी त्याला हटकले होते. दिवा येथे राहणाऱ्या संदीपच्या जवळील 70 हजारचे दागिने घेऊन लुटारू पसार झाले. या तिघांनीच हे कृत्य केले होते. 8 वर्षांनी रेल्वे पोलिसांनी संदीपला लुटणाऱ्या त्या चोरट्यांना या चोरीच्या निमित्ताने अटक केली. त्या चोरट्यांकडून संदीपकडून गेलेले दागिने हस्तगत केले. लॉकडाऊनमुळे संदीप घाग याची नोकरी गेली आहे. त्यात त्याची आई आजारी आहे. सध्या घराची आर्थिक परिस्थिती फार वाइट आहे. या परिस्थितीत त्यांच्याकडे पैसे नाहीत. दरम्यान संदीपला कल्याण जीआरपी पोलिसांनी फोन केला. त्यावेळी पोलिसांनी संदीपला तुमचे दागिने सापडले आहेत. तुम्ही घेऊन जा, असे सांगितले. हे सर्व ऐकून संदीपला आश्चर्य वाटले. या घटनेला आठ वर्षे उलटून गेले असतानाही अशी बातमी ऐकून त्याला सुखद धक्का बसला. कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी लवकरात लवकर संदीपचे दागिने त्यांना सुपूर्द केले पाहिजे, अशी सूचना संबंधित पोलीस अधिकारी रवींद्र आव्हाड यांना केली. संदीप घाग याने तातडीने पोलिसांशी भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी 70 हजार रुपये किंमतीचे दागिने त्याला परत केले. कोरोना काळात पैसे नाही, त्याच्यासाठी हा मोठा आधार मिळाला, अशी प्रतिक्रिया यानंतर संदीपने दिली.