ठाणे- बंगल्यात घुसून बंदुकीच्या धाक दाखवून धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोन्याच्या ऐवजासह एक कोटी 86 लाखांचा ऐवज पळवला होता. हा प्रकार भिवंडीतील काल्हेरमध्ये 30 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या घडला होता. पण, पोलिसांनी शिताफीने घटनेचा तपास करत 72 तासांतच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
या घटणेने ठाणे पोलिसांसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. पोलिसांनी दरोड्यातील म्होरक्या धर्मेश रणछोड वैष्णव (वय 38 वर्षे, रा.ऐरोली) याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून सव्वा कोटींचा ऐवज हस्तगत केला. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. या दरोड्यातील इतरांचा शोध सुरु आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून या गुन्ह्याचा यशस्वी तपास करणाऱ्या दोन्ही पोलीस पथकांना प्रत्येकी 25 हजारांचे पारितोषिक जाहीर केले आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत दिली.
भिवंडी, काल्हेर येथील गोदाम मालक व बांधकाम व्यावसायिक जगदीश पाटील यांच्या घरात 30 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. पाटील हे पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्याची संधी साधून घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी बेडरूममध्ये झोपलेल्या पाटील यांच्या पत्नी व मुलीला बंदुकीचा धाक दाखवून दोरीने त्यांचे हातपाय बांधले. नंतर तिजोरीतील 60 लाखांची रोकड व 421 तोळ्याचे सोन्याचे दागीने असा 1 कोटी 86 लाखांचा ऐवज घेऊन पसार झाले होते. या गुन्ह्याची माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.