ठाणे -ठाण्याच्या टिपटॉप हॉटेलच्या बाजूला असलेल्या विजय सेल्स येथे चोरी करणाऱ्या व्यक्तीला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती मूकबधिर आहे.
30 जूनला रात्री विजय सेल्स या दुकानात चोरी झाली होती. चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील काच फोडून आत प्रवेश करून दुकानातील ऍपल कंपनीचे 2मोबाईल फोन, 1 ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, 5 सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन, असा एकूण दोन लाख 28 हजारांचा माल चोरून नेला होता, याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना संशयित व्यक्ती आढळून आला. त्याच्या हालचालीवरून आणि शारीरिक ठेवणीवरून खबऱ्यांमार्फत त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. या आरोपीची चौकशी करताना तो मूकबधिर असल्याचे निष्पन्न झाले. मूकबधिर असल्यामुळे त्याची चौकशी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे कर्णबधिर मुलांच्या दुभाषकाला बोलावून त्यांच्यामार्फत आरोपीकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईलपैकी एकूण एक लाख 22 हजार रुपयांचे 4 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. आता पोलीस बाकीचे मोबाईल फोन कुठे आहेत, याचा शोध घेत आहेत.
सीसीटीव्हीमुळे आरोपी अटकेत
या चोरीच्या तपासामध्ये पोलिसांना सीसीटीव्ही मिळाले आणि त्याआधारे आरोपीचा शोध लागला आहे. एकीकडे टाळेबंदी असताना चोरीचे प्रकरण पोलिसांनी गंभीरपणे घेत आरोपीचा शोध लावला. मात्र, आरोपी बोलू शकत नसल्यामुळे सुरुवातीला पोलिसांची पंचायत झाली होती. मात्र, दुभाषकाच्या मदतीने हा तपास पुढे गेला.