ठाणे - एक रिक्षाचालक सार्वजनिक शौचालयात प्रातःविधीसाठी गेला असता, अज्ञात व्यक्तींकडून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना कल्याण पश्चिम भागातील उंबर्डे गावात शनिवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणाच्या पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून मृत रिक्षाचालक शेजारी राहणाऱ्या एका घरातील दाराच्या फटीतून वहिनी व भावाच्या बेडरूममध्ये पाहत असल्याने रिक्षाचालकाची दिरानेच निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. सोपान पंजे (वय 23 वर्षे), असे अटक आरोपीचे नाव आहे. अभिमान भंडारी (वय 51 वर्षे), असे निर्घृण हत्या झालेल्या रिक्षाचालकाच नाव आहे.
सार्वजनिक शौचालयात जात असतानाच हत्या..
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात रिक्षाचालक अभिमान भंडारी हे कुटुंबीयासह राहत होते. त्यातच शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर असलेल्या गावातील सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्यावेळी दबाधरून बसलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करून तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिमान यांना रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. तर खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.