मुंबई :ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू तरुणांचे धर्मांतर करून ‘मोबाईल जिहाद’ पुकारणारा आरोपी शाहनवाज मकसूद खान याला रविवारी ठाणे पोलिसांनी अलिबाग येथून जेरबंद केले. त्याला आज न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ४०० मुलांचे मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्याने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे आढळले होते. या पार्श्वभूमीवर गाझीयाबाद पोलिसांचे पथक शाहनवाज खान या आरोपीचा शोध घेत होते.
‘मोबाईल जिहाद’ :आरोपी शाहनवाजच्या चौकशीत, त्याची व पीडित मुलाची ओळख ही २०२१ च्या सुरुवातीस फोर्ट नाईट या गेमिंग या अॅप्लिकेशनवरून झाली असल्याचे समजले. गेम खेळताना एकमेकांशी बोलण्यासाठीच्या सुविधेमार्फत ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. नंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी हा गेम खेळणे बंद केले. त्यानंतर ‘वालोरंट’ हा नवा गेम डिसेंबर २०२१ अखेर खेळण्यास त्यांनी सुरुवात केली. हा गेम खेळत असताना ‘आईस बॉक्स’ या टार्गेटच्या ठिकाणी ते पोहोचले. तेव्हा दोघांमध्ये पहिल्यांदा धर्मांतर या विषयावर बोलणे झाले. झाकीर नाईक यानी केलेल्या भाषणावर ही चर्चा झाली होती.