ठाणे - थाप मारून 5 लाखांची खंडणी उकळणाऱ्या एका भामट्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तुषार श्रीमंत शिलवंत (36, रा. अष्टविनायक बिल्डिंग, कशेळीगाव, ता. भिवंडी) असे या तोतया पोलिसाचे नाव आहे.
पोलीस अधिकारी असल्याची थाप मारून 5 लाख उकळणारा गजाआड पोलीस नावाची पाटी लावून कारमधून फिरायचा
डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर परिसरात राहणारे शंकर गुणाजी परब (45) यांचे जिमखाना रोड येथे रजिस्टर एजंटचे कार्यालय आहे. 7 एप्रिल रोजी परब हे कार्यालयात बसले असताना तोतया पोलीस तुषार पोलिसाची पाटी असलेली कार घेऊन तेथे आला होता. 'मी वाशी क्राइम ब्रँचमध्ये आहे. तुमच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दाखल केली असल्याचे म्हणत त्याने परब यांना दरडावले. जर कारवाई नको असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील', अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे पोलीस स्थानकाच्या फेऱ्या नको म्हणून शंकर परब घाबरले. त्यांनी तोतया पोलीस आरोपी तुषारला तीन टप्प्यात 5 लाख रुपये दिले.
असा पकडला तोतया पोलीस
आरोपी तुषारला वाटले कि आपल्या धमक्यांना व्यापारी घाबरला आहे. त्यामुळे त्याच्याकडून अजून माल उकळू शकतो. त्यामुळे त्याने पुन्हा 13 एप्रिल रोजी मोबाइलवर फोन करून आणखी 10 लाख रुपये पाहिजेत, अशी परब यांना धमकी दिली. पैसे नाही दिले तर अटकेची कारवाई करण्याचीही तो धमकी देऊ लागला. अखेर भयभीत झालेल्या व्यापारी परब यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दादाहरी चौरे आणि फौजदार अनंत लांब यांना स्वतःवर ओढावलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी चौकशी केली असता तुषार शिलवंत नावाचा कोणीही नवी मुंबई क्राइम ब्रँचमध्ये नसल्याची खात्री पटली. त्यामुळे पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार तुषारला 10 लाखांपैकी 3 लाखांचा पहिला हफ्ता घेण्यासाठी कल्याणच्या दुर्गाडी येथे गुरुवारी सकाळी परब यांनी बोलावले. तुषार पैसे घेण्यासाठी त्याच्या गाडीतून आला. फौजदार अनंत लांब यांच्या नेतृत्वाखाली विजय कोळी, दामू पाटील, मधुकर घोडसरे, संदीप बर्वे, महेंद्र मंझा, प्रविण किनरे, संतोष वायकर, महादेव पवार यांच्या पथकाने सापळा रचला. या सापळ्यात अडकलेल्या तुषारला व्यापारी परब यांच्याकडून पैसे घेताना रंगेहात अटक केली. त्याच्याकडून एम एच 04 / एफ ए / 2132 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. या आरोपीने अशाच प्रकारे अन्य कुणाची फसवणूक केली आहे का? याचा तपास फौजदार अनंत लांब करत आहेत.
साखरेचा व्यापारी झाला तोतया पोलिस
आरोपी तुषार हा पूर्वी साखरेचा व्यापार करत होता. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सारेच धंदे ठप्प झाल्याने त्याने तोतया पोलीसगिरीचा गोरखधंदा धंदा सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तुषारवर खंडणीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा -चिमुकल्या जुळ्यांना घरी ठेवून 'या' दाम्पत्याचे कोरोना बाधितांच्या सेवेला प्राधान्य