ठाणे - साडे सहा लाख रुपयांच्या कापडांचे तागे लंपास करणाऱ्या दुकलीला सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या ५ ते ६ तासात भोईवाडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना भिवंडी शहरातील अजंटा कंपाऊंड येथील नवकार अपार्टमेंटमधील एका गाळ्यात घडली होती. सुजित शिवचंद केसरवाणी आणि मनोज नरसिंह सिंह असे लाखोंचा कपडा लंपास करणाऱ्या चोरट्यांची नावे आहेत.
भिवंडी शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटना पोलीस नागरीक, व्यावसायिकांसोबतच प्रशासनालाही डोखेदुखी ठरत आहे. अशातच, रात्रीच्या सुमारास अजंटा कंपाऊंड येथील नवकार अपार्टमेंटमधील बंद गाळ्याचे कुलूप बनावट चावीने उघडून त्यातील विविध दर्जाच्या कपड्यांचे १६० तागे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाळा उघडल्यानंतर व्यवस्थापकाच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी मालक निसार अहमद रमजान खान यांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. खान यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.