महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत पोलिसावर जीवघेणा हल्ला; आरोपी ८ तासात जेरबंद - भिवंडी पोलीस हल्ला न्यूज

कोरोनाच्या संकटात पोलिसांवर हल्ले होण्याच्या अनेक घटना घडत आहेत. भिवंडीतही एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यातील दोन्ही आरोपींना ठाण्यानजीक असलेल्या येऊरच्या जंगलातून ८ तासातच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

police arrested 2 accused for Fatal attack on police in Bhiwandi
भिवंडीत पोलिसावर जीवघेणा हल्ला; आरोपी ८ तासात जेरबंद

By

Published : Aug 2, 2020, 7:26 PM IST

ठाणे - कोरोनाच्या संकटात पोलिसांवर गुन्हेगारांकडून हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. भिवंडीतही एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यातील दोन्ही आरोपींना ठाण्यानजीक असलेल्या येऊरच्या जंगलातून ८ तासातच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

रवींद्र धनाजी भोसले ( वय 20 ) व लखन अंकुश जाधव ( वय 20 ) (दोघेही रा. देवजी नगर,नारपोली भिवंडी) अशी आरोपींची नावे आहेत. तर प्रफुल्ल जाऊ दळवी (वय 52 )असे जीवघेणा हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून आरोपींचा मोबाईल नंबर प्राप्त केला व त्यानंतर मोबाईल नंबरच्या लोकेशनवरून दोघा हल्लेखोरांना अटक केली.


एकीकडे कोरोना संकट आणि दुसरीकडे राज्यासह देशभरात साजरे होणारे सण यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी देशभरात बकरी ईद सण साजरा होत असताना भिवंडीतील भंडारी कंपाऊंड चौक येथे तरुणांमध्ये झालेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच धारदार चाकूने हल्ला झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. जखमी पोलिसाला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेने भिवंडी पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.


भोईवाडा पोलीस ठाण्यात नेमणूकीतील पोलीस हवालदार प्रफुल्ल जाऊ दळवी, यांना मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणानिमित्त भंडारी चौक येथे होमगार्ड सावंत यांच्यासोबत फिक्स पॉईंट ड्युटी नेमलेली होती. यावेळी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास येथील नझराणा मेडिकलजवळ असलेल्या किराणा दुकानाच्या बाजूला दोन व्यक्ती एकाला मारहाण करत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस हवालदार दळवी यांनी सहकारी होमगार्ड सावंत यांच्यासोबत जाऊन तरुणांमध्ये झालेले भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मारहाण करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने पोलीस हवालदार दळवी यांना जोराचा धक्का दिला व दुसऱ्याने धारदार शस्त्राने त्यांचे डाव्या हाताच्या कोपऱ्यावर, खांद्यावर तसेच डाव्या कानावर वार करून गंभीर जखमी केले. येथील नागरिकांनी जखमी पोलीस हवलदार दळवी यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ऐन बकरी ईदच्या दिवशी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


यानंतर भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून आरोपींचा मोबाईल नंबर प्राप्त केला आहे. मोबाईल नंबरच्या आधारे या हल्ल्यातील आरोपी रवींद्र धनाजी भोसले व लखन अंकुश जाधव या दोघांनाही मोठ्या शिताफीने पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पोलीस हवलदार दळवी यांच्यावर कटरने वार करून जखमी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे.पी.जाधव व तपास पथकाचे कर्मचारी पोलीस नाईक अरविंद गोरले, पोलीस काॅन्स्टेबल देवीदास वाघेरे, दिनकर सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. आज दोघाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details