ठाणे -कल्याणमध्ये खाकी वर्दीला कलंक लागल्याची घटना समोर आली आहे. पोलीस उप निरीक्षकासह २ हवालदारांना ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय
पोलीस उप निरीक्षक हरिश कांबळे (वय ३४), पोलीस हवालदार अंकुश नरवणे (वय ५७), पोलीस नाईक भरत येसु खाडे (वय ४९) अशी लाचखोरांची नावे आहेत. हे तिघेही महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
गुटखा वाहतूक करण्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ५० वर्षीय तक्रादाराला या 3 लाचखोर पोलिसांनी धमकी दिली होती. त्यांच्याकडे ५ लाखांची मागणी केली. त्यावेळी तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार या तिघाही लाचखोरांनी १ लाख रुपयांची लाच घेतली. त्यांनतर उर्वरित ५० हजार रुपयांसाठी तक्रादाराकडे तगादा लावला. यामुळे तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तिन्ही लाचखोर पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यात १ लाख रुपये लाच घेतल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, लाचखोर पोलिसांनी तक्रारदारास ५० हजार रुपये वालधुनी पोलीस चौकीत घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास याठिकाणी सापळा रचला. त्या सापळ्यात तिघेही लाचखोर पोलीस अलगद अडकले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक, हरिश कांबळे, पोलीस हवालदार, अंकुश नरवणे आणि पोलीस नाईक, भरत येसु खाडे यांच्या विरोधात लाचखोरीच्या गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मुंकुद हातोटे करीत आहेत.