ठाणे -हवामानातील बदलावामुळे विषारी-बिन विषारी साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटना सतत घडत आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरातील मानवीवस्तीसह रहदारीच्यातून ३ विषारी-बिन विषारी साप सर्पमित्राने पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.
भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी -
नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी-बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी मानवीवस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत असतानाच कल्याण पश्चिममधील वाडेघर सर्कल तेथील रस्त्यावरच एका नागरिकाला भलामोठा काळ्या रगांचा अंगावर चट्टेबट्टे असलेला साप दिसला. मात्र, सापाला पाहून भर रस्त्यावर गोंधळ उडाला होता. तर कारभारी नावाच्या व्यक्तीने या सापाची माहिती सर्पमित्र हितेश यांना दिली. सर्पमित्र हितेश घटनस्थळी येऊन या सापाला पकडून पिशवीत बंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप घोणस जातीचा असून ५ फूट लांबीचा होता. तर घोणस जातीचा साप खूपच विषारी असल्याची माहिती सर्पमित्राने दिली.
विषारी कोब्रा नाग मुजराच्या खोलीत -
दुसऱ्या घटनेत कोळीवली गावात एका गृह संकुल उभारणीचे काम सुरु आहे. या ठिकाणी मजुरांना राहणाऱ्यांसाठी पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या, याच पत्र्याच्या खोलीत भिंती लगत विषारी कोब्रा नाग सिमेंट साहित्यात शिरला होता. यामुळे मजुरांमध्ये पळापळ झाली होती. तर खोलीत शिरल्याची माहिती साईट सुपरवाईजरने सर्पमित्र हितेश यांना दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेश यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप ५ फूट लांबीचा असून अंत्यत विषारी अश्या कोब्रा जाती होता. सर्पमित्राने या कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्याने कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.