ठाणे - डोंबिवली औद्योगिक विभागात उद्योजक आणि नागरिकांच्या सोईसाठी पेंढारकर कॉलेजच्या मागे एमआयडीसी पोस्ट ऑफिस आहे. या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. मात्र, या पोस्ट ऑफिसच्या मागे कचऱ्याचे ढीग साठल्याने उंदीर, घुशी यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी पोस्ट ऑफिसच्या आवारात भक्ष्याच्या शोधात असलेल्या सापांचा वावर वाढला आहे. हे साप पोस्ट ऑफिसचा आश्रय घेत असल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोस्ट ऑफिसच्या आवारात मोठे गवत, झाडी वाढलेली असून जुने सामान आणि कचराही पडलेला आहे. ऑफिसच्या बाजूच्या भूखंडावर व रस्त्याच्याकडेला कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. आत्तापर्यंत टेबलाच्या खणात, टेबल, कपाटाच्या खाली साप आढळले आहेत. पोस्ट ऑफिसचे दरवाजे, खिडक्यांना असलेल्या पोकळीतून उंदीर, साप कार्यालयात येत असावेत, अशी शंका आहे.