ठाणे - मागील वर्षभरापासून सर्वत्र चर्चिली गलेली प्लॅस्टिकची अंडी भिवंडी तालुक्यात दाखल झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकतेच तालुक्यातील सुरई या गावातील एका व्यक्तीने आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी आणली असता त्यामधील काही अंडी प्लॅस्टिकची आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
प्लॅस्टिकची अंडी आढळल्याने भिवंडीत खळबळ; अंडी खाणाऱ्यांची झाली गोची - thane
सुरई या गावातील एका व्यक्तीने आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी आणली असता त्यामधील काही अंडी प्लॅस्टिकची आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
भिवंडी तालुक्यातील सुरई येथील संतोष साळवी यांनी गावानजीकच्या माणकोली येथील कृष्णा सुपर मार्केट या दुकानातून आपल्या घरी खाण्यासाठी ४० अंडी खरेदी केली. त्यांची पत्नी मनीषा हिने यापैकी काही अंडी मुलांना खाण्यासाठी उकडली असता त्याचे कवचाचे तुकडे-तुकडे निघत असल्याने व त्यातील बलक खात असताना त्या अंड्यास नेहमीचा ओळखीचा असा वास येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी आपल्या पतीस या अंड्याबाबत सांगितले. त्यांनी सुध्दा तपासले तर काही अंड्यांचा आकार ओबडधोबड आढळून आला. त्यातील काही अंडी फोडून पहिली तर त्यातील पिवळा बलक हा एक वास विरहित आढळला. त्यामुळे त्यांनी ठाणे येथील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयास संपर्क करून या बाबत माहिती दिली.
ठाणे येथील अन्न औषध निरीक्षक माणिक जाधव यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडील सहा अंडी परीक्षणासाठी ताब्यात घेतली आहेत. त्याची चाचणी झाल्यावरच ही अंडी नक्की कसली आहेत, हे स्पष्ट होणार आहे. उन्हाळ्यात बऱ्याचदा अंडी खराब होत असल्याने तसा काही प्रकार आहे का? हेही तपासले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ग्रामीण भागात प्लॅस्टिकची अंडी आढळून आल्याने पावसाळ्याच्या दिवसात अंडी खाणाऱ्या खवय्यांची चांगलीच गोची झाली आहे.