ठाणे:उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील भाजपचे पदाधिकारी निलेश बोबडे हे कुटूंबासह राहतात. त्यातच मध्यप्रदेश राज्यातील इंदोर पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी आरोपी इस्माईल अब्दुल अब्बासी नावाच्या व्यक्तीला पिस्तूलासह इंदोर शहरातून अटक केली होती. त्यानंतर इंदोर पोलीस पथकाने आरोपी इस्माईलकडे अधिक चौकशी केली असता, तो एका चिकन विक्रीच्या दुकानात काम करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर आरोपी इस्माईलकडे पिस्तूल कुठून आले याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल भाजप पदाधिकारी निलेश बोबडे यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.
अन् पोलीस धडकले ठाण्यात: त्यानंतर ह्या घटनेचा तपास करण्यासाठी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी इंदोर पोलिसांचे एक पथक उल्हासनगरमध्ये दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने नीलेश बोबडे यांना विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात बोलवून त्यांच्याकडे चौकशी केली. यानंतर कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार अयलानी या दोन्ही आमदारांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आपल्या समर्थकांसह धाव घेतली.
बोबडे म्हणतात, मला फसविण्याचा प्रयत्न:याविषयी भाजप पदाधिकारी निलेश बोबडे ह्यांना विचारले असता, हा एक राजनीतिक कट असून मला फसवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आरोपी इस्माईलने निलेश बोबडे यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क केल्याचे पोलीस तपासात आढळून आले. मात्र दोघात कुठलेही संभाषण झाले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. निलेश बोबडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी याचा काही संबध आहे का? असे विचारले असता, त्यांनी अधिक बोलणे टाळले. पिस्तूल विषयी आपण पोलिसांना तपासात मदत करणार असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.