ठाणे - डोंबिवलीतील एका जिममध्ये ट्रेनर असलेल्या एकाने जिममध्ये व्यायाम करण्यास येणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, या जीम ट्रेनरवर डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला आहे. सिद्धेश पाटील असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अत्याचार झालेल्या तरुणीच्या वतीने अंनिस कायदा व्यवस्थापन विभागाच्या राज्य सहकार्यवाह तथा कल्याण तालुका विधी सेवा समिती पॅनलच्या पदाधिकारी अॅड. तृप्ती पाटील यांनी ही माहिती गुन्हा नोंदविलेल्या कागदपत्रांसह दिली आहे.
चॅटिंगमुळे जवळकी वाढली, अन...
डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ रोडला राहणारी दक्षिण भारतीय 26 वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी करते. ही तरुणी डिसेंबर 2019पासून डोंबिवली स्टेशन परिसरातील एका जिममध्ये व्यायाम करण्यास जात असे. तेथे न्यूट्रिशनिस्ट म्हणून नोकरी करणारा आरोपीशी ओळख झाली. तर आरोपी हा 90 फिट रोड परिसरात राहतो. जिममध्येच ओळखी होऊन त्याचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर दोघे एकमेकांशी चॅटींग, व्हिडीओ कॉल, फोन कॉलवर बोलणे सुरू झाले. कालांतराने एकमेकांच्या गाठी-भेटी सुरू झाल्या. त्यानंतर दगाबाज सिद्धेश याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून जवळपास वर्षभर वारंवार बलात्कार केला. यानंतर लग्नाच्या आणाभाका देणाऱ्या आरोपी सिद्धेशने लग्न करण्यास नकार दिला.