ठाणे- कोरोना विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असून अमेरिकेसह अनेक देशात दररोज शेकडो लोकांचा बळी जात आहे. या संकटाची व्याप्ती ओळखून केंद्र आणि राज्य सरकारांनी संचारबंदीसह संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला. नागरिकांमधील संपर्क तोडून विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, ठाण्यातील गॅस सेवा पुरवणाऱ्या एका एजन्सीने कायद्याला हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. शहर पूर्व भागातील कन्हैया नगर समोरील ओंकार गॅस एजन्सीने घरपोच गॅस वितरण सेवा बंद केल्याने नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून सिलेंडर नेण्यासाठी एजन्सीत यावे लागत आहे.
गॅस एजन्सीमध्ये दररोज एकामागोमाग एक असे शेकडो नागरिक लांब रांगा लावून असल्याचे दिसतात. सरकारी आदेशानुसार दोन व्यक्तींमध्ये किमान ३ फुटांचे अंतर असणे गरजेचे आहे. मात्र, ओंकार गॅस एजन्सीत सगळे ग्राहक एकमेकांना खेटून असल्याचे दिसते. एजन्सीच्या या बेजबाबदार वर्तनामुळे संक्रमणाचा धोका प्रचंड वाढला असून अनेकांना कोरोना विषाणूची बाधा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.