कल्याण-डोंबिवली (ठाणे) - मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच लोकल सेवा बंद, त्यातच सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित साधने, कार्यालये, कारखाने सुरू झाल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. तसेच कल्याण, डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून विकास कामे सुरू आहे. यामुळे वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नोकरदारांना आठ तासांच्या नोकरीसाठी व पाच तासांचा प्रवास करावा लागत असल्याने नोकरदारवर्ग वैतागला आहे. यामुळे लवकरात लवकर लोकल सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे.
वर्षभरापासून राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे कल्याण-शीळ मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याची कामे आधुनिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण केली जात असल्याचा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वारंवार करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. या रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल वाहतूक बंद असल्याने कल्याण-डोंबिवलीतून मुंबई-ठाण्यातील कार्यालयात जाणारे कर्मचारी सध्या खासगी वाहनाने या रस्त्याचा वापर करत कार्यालय गाठत आहेत. त्यामुळे रोज सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.
वर्षभरापासून सुरू असलेल्या कामामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद झाला आहे. त्याचबरोबर कामासाठी काही ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी झालेल्या अर्धवट कामांमुळे हा रस्ता उंच सखल झाला आहे. त्यातच पावसामुळे या रस्त्यावर खूप खड्डे पडले असून रस्त्यावरील डांबरही वाहून गेले आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाल्यापासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे २० ते ३० मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या मार्गावर चार ते पाच तास या कोंडीत अडकून पडावे लागते.