ठाणे - शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यात वीज पडण्याच्या वेगवेगळ्या दोन घटनेत एकूण 27 ग्रामस्थ जखमी झाले असून त्यातील 7 जण अत्यवस्थ आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी भिवंडी व शहापूर तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी उप जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच जखमींना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नार्वेकर यांना दिले.
मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान केले आहे. त्यातच शिरोळ हद्दीतील फणसपाडा या आदिवासी वस्तीतील भिका भाऊ थोराड यांच्या घरावर काल रात्रीच्या सुमारास वीज कोसळल्याने घरातील व शेजारी राहणारे 23 रहिवासी जखमी झाले आहेत. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाहीय. मात्र घरांचे नुकसान झाले आहे. घरावरील वासे जळून खाक होऊन कौलं आणि भिंतीला तडे गेले आहेत. तर घरातील अन्नधान्य पूर्णतः पावसात भिजले आहे.
23 जखमींपैकी सातजण जण गंभीर असून यामध्ये जया पिंटू थोराड, भरत जानू थोराड, रंजना मनेश व्हले, सनी सुरेश थोराड, शिड्या भिका थोराड, सुनीता थोराड व अन्य एक जण अत्यवस्थ आहे. सर्व जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्रथोमोचार करून पुढील उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यासोबतच दुसरी घटनाही शहापूर तालुक्यात ढेंगणमाळ (पाटोळ) येथे घडली आहे. घरा समोरील वीज वितरणच्या पोलवर वीज पडल्याने सर्व्हिस वायरने पेट घेतला. त्यामुळे घरातील वीज मीटरमध्ये आग लागली होती. या घटनेत पोल जवळ उभे असलेले कृष्णा अवाली हा तरुण व साहिल भला हा 6 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलाय.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार निलिमा सूर्यवंशी, शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तू भोये, तलाठी सौंदराने, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱयांनी भेट देत पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी अहवाल सादर केला.