मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर क्षेत्रातील आधारकार्ड केंद्राच्या भोंगळ कारभाराबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. भाईंदर पूर्वेच्या सेव्हन इलेव्हन शाळेसमोरील आधार केंद्रात महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची दलालाकडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
सुरेश दर्गे नावाचा व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात कार्यरत आहे. त्यांच्या गर्भवती पत्नीला दवाखान्यात नेण्यासाठी त्याला पैश्यांची गरज होती. रुग्णालयाच्या खर्चासाठी त्याने आपल्या पीएफ फंड मधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. दर्गे यांच्या सर्व कागदपत्रांवर वडिलांचे पूर्ण नाव होते. मात्र, आधार कार्डवर पूर्ण नाव नसल्याने ते आधार केंद्रावर दुरुस्त करण्याकरिता गेले. त्यावेळी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी हे बदल करण्यासाठी एक शपथपत्र द्यावे लागेल, असे सांगितले. तसेच त्याच्याकडे या कामाकरिता 900 रुपयांची मागणी केली. मात्र, इतर कागदपत्रांवर वडिलांचे नाव असताना, आधार कार्डवर नावात दुरुस्त का करत नाही, असा प्रश्न त्याने विचारला असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणावरून या आधारकार्ड केंद्रावर कर्मचारी आणि दलाल यांच्यात साटंलोटं असून जनतेची दिशाभूल करत त्यांना लुटले जात असल्याचे समोर आले आहे.