नवी मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 300 पार गेल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मास्क न लावल्यास, रस्त्यावर थुंकल्यास तसेच खरेदी करताना सामाजिक अंतर न पाळल्यास दंड आकारण्यात येणार आहे. असा आदेश नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने काढला आहे. मात्र, हा आदेश आधीच काढला असता तर नवी मुंबईत कोरोनाचा प्रसार बऱ्यापैकी थांबवता आला असता अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
नवी मुंबईत कोरोना फैलावल्यानंतर मास्कबाबत करणार दंड आकारणी - mumbai corona
नवी मुंबईत मास्क लावण्यासाठी फक्त आवाहन केले गेले होते, मात्र मास्क न लावल्यास कुठल्याही प्रकारे दंड आकारण्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिक शहरात विना मास्क फिरत होते.
कोरोनाचा शिरकाव राज्यात झाल्यानंतर मुंबई हे कोरोनाचे केंद्रस्थान बनले. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून मुंबई आणि आजूबाजूच्या महापालिकांनी मास्क सक्ती केली होती आणि मास्क न लावल्यास दंड आकारणी केली होती. मात्र, नवी मुंबईत मास्क लावण्यासाठी फक्त आवाहन केले गेले होते, मात्र मास्क न लावल्यास कुठल्याही प्रकारे दंड आकारण्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिक शहरात विना मास्क फिरत होते. मात्र, आता नवी मुंबईत कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. शहरात कोरोनाचे झपाट्याने रुग्ण वाढत असून 300 च्या वर रुग्ण झाले आहेत. त्यामुळे आता नवी मुंबई महानगरपालिकेला उशिरा शहाणपण सुचले आणि शहरात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर विना मास्क लावून कोणी फिरले तर त्यास 500 रु. दंड आकारण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रु. दंड तसेच दुकानदारांनी देखील सामजिक अंतर ठेऊन वस्तू विक्री नाही केली तर दुकानदारास 2000 रु दंड व ग्राहकास 200 रु दंड आकारण्यात येणार आहे. ही कृती दुबार केली तर दुप्पट दंड आणि फौजदारी कारवाई करण्यात नेणार आहे, असे मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले आहे. मात्र, ही दंड आकारणी मनपाने अन्य महापालिकांसोबत वेळीच केली असती तर आज नवी मुंबईत कोरोनाचा प्रसार बहुतांशी कमी झाला असता, अशी भावना सर्व सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.